फार्फार वर्षापूर्वीपासूनच मला लिनक्स वापरायची खुमखुमी होती. त्याची कारणे वेळोवेळी बदलत गेली मात्र खुमखुमी तशीच राहिली.
कारण क्र. १ : मी ऐकलेला सुविचार : “Linux is not for everybody” मला “everybody” असण्यापेक्षा “somebody different” होण्यात इंटरेस्ट होता.
मात्र त्यावेळी फॅशन शो मधील कपड्यांचा व्यवहारात जेवढा फायदा असेल तेवढाच लिनक्स चा होता.
कालाय तस्मै: नमः या उक्तीप्रमाणे फॅशन शो मधे बघीतलेली वस्त्रप्रावरणे ललनांच्या अंगाखांद्यावर (काहीतरी चुकतंय इथं !) दिसू लागली आणी त्याचप्रमाणे लिनक्सदेखील दैनंदिन गरजा भागविण्याच्या द्रुष्टीने सक्षम होते गेले. (येथे कपड्यांचा प्रवास कमाल पासून किमान पर्यंत आणी लिनक्स चा प्रवास किमान पासून कमाल असा होत गेला असा अर्थ घ्यावा.)

नमनालाच घडाभर तेलं संपलयं…. आता मूळ मुद्द्याकडे………

तर लिनक्स वापरण्याची अपेक्षा वाढण्याची कारणे…..
१) लिनक्स मोफत आहे. (जर तांत्रिक सेवा हवी असल्यास पैसे मोजावे लागतात.)
२) तुमच्या जुन्या संगणकावर देखील उत्तम प्रकारे चालते.
३) सध्यातरी संगणक विषाणू मुक्त आहे. (मात्र विषाणूप्रतिकारक सॉफ्टवेअर ही उपलब्ध आहेत.)
४) दैनंदिन वापरातील विंडोज वर होणारी जवळजवळ सारी कामे लिनक्सवर करता येतात.
५) खिडक्या वापरुन कंटाळा आला होता.
६) आपण चोरीचे सॉफ्टवेअर्स वापरतोय पण त्याचवेळी विकत घेऊन वापरणे शक्य नाही ही भावना देखील प्रबळ होत गेली.

तर अशाच कारणांमुळे मी लिनक्स कडे आकर्षीत झालो. मग सुरु झाला मला हव्या असणार्‍या योग्य लिनक्स चा शोध.
मी हार्डवेअर क्षेत्रातच काम करीत असल्यामुळे काही सॉफ्टवेअर्स अतिशय म्हणजे अतिशय गरजेची होती. ती अशी…..

१) ऑफीस सुट : सगळीकडे मायक्रोसॉफ्ट ऑफीस वापरुन बनविलेल्या वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट फाईल्स उघडणे, त्यात बदल करणे आणि पुन्हा मायक्रोसॉफ्ट
ऑफीस वाचू शकेल अशाप्रकारे सेव्ह करणे. ( ओपन ऑफीसने हा प्रश्न सोडविला. वापरण्यास अगदी सोपे आणी मायक्रोसॉफ्ट ऑफीस सारखेच.)

२) इमेल : ही सुविधा हवी म्हणजे हवीच. इमेल म्हणजे आजच्या युगातली ढाल, तलवार, माहितीकोष इ. इ. तुम्हीही कोणतेही विशेषण घ्या. ते इथे लागू होणारच.
पूर्वी संगणक साक्षर आणी निरक्षर हा भेद होता. तो आता जवळपास नाहीच. मात्र मेल वापरता येणारा तो साक्षर आणि नाही तो निरक्षर हा या युगाचा नवीन नियम
आहे. तुम्ही तुमच्या सहकार्‍याच्या / बॉसच्या मांडीला मांडी लाउन बसत असाल, रोज त्याला तोंडी सुचना / कामाचे अपडेटस देत असता. मात्र एखाद्या अवघड
क्षणी तो तुम्हाला “मेल  पे डाला था क्या ?” असे विचारुन खिंडीत गाठतो. त्यावेळी जर तुमच्याकडे मेलची कॉपी मिळाली नाही तर तुम्ही मेलातच समजा.
(ह्या अवघड क्षणी मोझीला थंडरबर्ड अगदी देवासारखा धावून येतो. तो तुमचे आऊटलुकचे मेल वाचून आपल्या फॉरमॅटमधे सेव्ह करु शकतो. मी तर विंडोजवरही
मोझीला थंडरबर्ड वापरत असल्याने माझे काम अगदी सोपे झाले.)

३) आंतरजाल न्याहाळक (वेब ब्राऊजर) : आय ई च्या बदल्यात फायरफॉक्स, गुगल क्रोम इ.इ.) – विंडोज आणि लिनक्स दोन्हीकडे उपलब्ध.
४)  ऑडिओ / व्हिडिओ : व्ही.एल.सी. प्लेयर : – विंडोज आणि लिनक्स दोन्हीकडे उपलब्ध.
५)  पीडीएफ रीडर : ऍडोब – विंडोज आणि लिनक्स दोन्हीकडे उपलब्ध.
६)  टीमव्ह्युवर : इंटरनेटवरुन दुसरा संगणकाशी जोडून त्याचा ताबा घेऊन त्याला मदत करणे : – विंडोज आणि लिनक्स दोन्हीकडे उपलब्ध.

आणी याव्यतिरीक्त इतर अनेक ऍप्लिकेशन्स… त्याबद्दल पुढील लेखात……

माझं अगदी मजेत चाललेलं असतं. पण मधेच कुठेतरी माशी शिंकते आणि “चिंता करीतो विश्वाची” असे विचार मनात यायला लागतात. टाटा,बिर्ला, अंबानी यांची नावे आपण रोजच या ना त्या निमित्ताने ऐकत असतो. या नावांनी आपलं दैनंदिन आयुष्य कसं व्यापलयं त्याची ही एक झलक !

टाटा : वीज, चहा पावडर, कॉफी, मीठ, पाणी स्वच्छ करणारे यंत्र (वॉटर प्युरीफायर), चश्मे, घड्याळ, युपीएस, ट्रेन्ट (वेस्टसाइड- तयार कपडे), क्रोमा, स्टार बाजार, तनिष्क ज्वेलरी, टाटा स्काय, फोन, इंटरनेट, जीवन विमा, सर्वसाधारण विमा, पोलाद, केमिकल्स, आयटी आणि सॉफ्टवेअर सर्विसेस, हॉस्पीटल, हॉटेल्स, फायनान्स, म्युचुअल फंडस्, चार चाकी कार्स, तीन चाकी टेम्पो, चार चाकी वाहने, अवजड वाहने, शीतयंत्र (ए.सी.), औषधे, ग्रुहनिर्माण, अक्सेस कंट्रोल सिस्टीम्स, ऑटोमेशन सिस्टीम्स, बंदरे (पोर्टस्) इ.

रिलायन्स : वीज, मीठ, कपडे, मैट्रेसेस, ग्यास, पेट्रोलियम, लॉजिस्टीक्स, बिग टिव्ही, फोन, इंटरनेट, जीवन विमा, सर्वसाधारण विमा, केमिकल्स, आयटी आणि सॉफ्टवेअर सर्विसेस, हॉस्पीटल, फायनान्स, रिलायन्स फ्रेश, सोलार प्रॉड्क्टस्, मेट्रो ट्रेन, म्युचुअल फंडस् इ. इ.

काही कालाने आपण टाटा, रिलायन्सशिवाय जगू शकू काय ? ह्या स्वदेशी “ईस्ट इंडिया” कंपनीज तर होणार नाही ना !

(टीप : हाच लेख http://mr.upakram.org/node/2661 इथेही चर्चाप्रस्ताव म्हणून प्रकाशित करण्यात आला आहे. चर्चा येथे वाचावयास मिळेल.)

नमस्कार !

आज हा नवीन ब्लॉग चालू करतांना फारच आनंद होत आहे.

वाचनाची आवड तशी फारच लहानपणापासूनची. अगदी मिळेल ते वाचायचे (अभ्यासाची पुस्तके सोडून) हे अगदी व्यसनच जडून गेले.
जसजसा मोठा होत गेलो तसतसे पुस्तक वाचनाचे व्यसन वाढतच गेले. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या मदतीमुळे (घाटकोपर) हे व्यसन महिना १० रु. इतक्या कमी खर्चात भागवले जायचे. आताही त्यांची मासिक वर्गणी फक्त ४० रु. इतकी अल्प आहे. मात्र नंतर घर बदलल्यानंतर आणी नोकरी लागल्यानंतर ग्रंथसंग्रहालयाला भेट देणे दुरापास्त होऊ लागले. (रोज दोन पुस्तके वाचून संपविण्याचा वेग आता आठवड्याला एक एवढा खाली आला.)

मात्र याच काळात आंतरजालाशी सलगी वाढली. इंग्रजी ब्लॉग्स नुकतेच बाळसं धरीत होते. मात्र काही तान्त्रिक ब्लॉग सोडता इतर वाचनात रस वाटत नव्हता.  सुरुवातीचे वाचन फक्त मराठी वर्तमानपत्रांपुरतेच मर्यादित होते. त्यातही लोकसत्ता आवडीचा पण त्याची ऑनलाईन आवृत्ती सकाळ / म.टा. यांच्या बर्‍याच नंतर सुरु झाली. सकाळ / म.टा. वर ताज्या बातम्या नियमीत अपडेट व्ह्यायच्या मात्र लोकसत्ता तिथेही मागेच. त्यामुळे सकाळ / म.टा. इथेच वावर जास्त.

नंतर नंतर म.टा. ची डावी बाजू “मटा फोटोगॅलरी” ही “उघडीबंब / स्पायडर वूमन” असल्या विशेषणांनी सजू लागल्यावर तेथे जायचा उबग येऊ लागला.
अशातच कधीतरी “http://marathiblogs.net/” हे संकेतस्थळ माहित झाले अन आनंदाला पारावार राहिला नाही. अनेक ब्लॉग्ज, संकेतस्थळांचे दुवे तिथे मिळाले.
त्यानंतर उपक्रम, मिसळपाव, मायबोली, मराठीब्लॉग्ज.नेट ही नित्य वारीची ठिकाणे झाली. आता तर रोज इथे आल्यावाचून करमतच नाही.

आदित्य जोशी, महेंद्र कुलकर्णी, धोंडोपंत, इरावती, ट्युलिप्स इन ट्विलाईटस (हा आता फक्त आमंत्रितांसाठीच आहे), भुंगा, “टॅलीनामा !”, आजुनकर्णांचा “पुणेकर.नेट” (यांचे ब्लॉगचे टेम्प्लेट मला फारच आवडले होते व ते मला माझ्या ब्लॉगवर कसे वापरता येईल अशी विचारणा देखील केली होती. त्यांनी मला त्वरीत उत्तर हि दिले होते. मात्र आता साहेबांना पोटपाण्याच्या उद्योगातून सवड नाही असे दिसते. बरेच दिवस ब्लॉगवर काहीही नवे लिखाण नाहीये. ) हे माझे आवडते झाले.

लग्न झालेल्या नवविवाहित जोडप्याला सुरुवातीची ३-४ वर्षे एकमेकांव्यतिरीक्त दुसरे कोणीही नको असते मात्र त्यानंतर इतरांची गोड बाळं पाहून आपल्यालाही एक बाळं असावं असं प्रकर्षाने वाटायला लागतं.

वरील ब्लॉगकर्त्यांची गोंडस ब्लॉगबाळं पाहून (त्यातील बरीच बाळं आता चांगली बाळसेदार झाली आहेत बरं !!) आपल्याला का नाही हा विचार दिवसेंदिवस मनात रुजत चालला आणी ह्या ब्लॉगचा जन्म झाला.

मला लिहीते करणारे असंख्य ब्लॉगर्स्, त्यांची ब्लॉगबाळे आणि “उपक्रम” संस्थळावरुन मला एका चर्चाप्रस्तावाद्वारे मार्गदर्शन करणारे श्री. प्रमोद देव, शंतनू , प्रा.डॉ.दिलीप बिरुटे” यांचा ऋणनिर्देश करुन मी माझे आंतरजालावरील वास्तव्य मला स्वतःला आणि इतरांना आनंददायक ठरेल अशी आशा करतो.

धन्यवाद !

« Newer Posts

प्रवर्ग