Posted by: rajdharma | 26/08/2010

एक मुलाखत

मी कामानिमित्त भारत भ्रमण करत असतो. प्रवासात वेगवेगळ्या प्रकारची माणसे भेटतात. त्यांच्याशी विविध विषयावर गप्पा मारताना करमणूकही होते आणि ज्ञान वाढते. अशीच एका वल्लीशी माझी गाठ पडली त्याचाच हा किस्सा ! सोयीसाठी आपण त्या व्यक्तीला “श” म्हणूया.

श : नमस्कार !

मी : नमस्कार !

काय ? कुठे चाललाय ?

मी : पुण्याला गेलो होतो  ऑफीसच्या कामाकरीता. आता घरी चाललो आहे. आपण ?

श : मी ही मुंबईलाच चाललोय. माझा स्वतःचा व्यवसाय आहे. त्यानिमित्त बराच प्रवास करावा लागतो.

(मी संवाद थांबवून पुस्तकात डोके घालतो.)

श : पुस्तक वाचनाची फारच आवड  दिसतेय वाटतं !

मी : होय. सध्या “हिंदू” वाचतोय.

श : छान ! छान ! सध्या मराठी सायटींवर चांगलीच चर्चा रंगलेली आहे ह्या पुस्तकावर.

मी : होय. पण बरेच जण त्यावर न वाचताच लिहितायत. बोलतायत. मी पण त्यावर लिहावं म्हणतोय, म्हणून वाचून घेतो.

श : अरे व्वा ! म्हणजे तुम्ही ब्लॉग रायटर का ? अहो पण एकाच विषयाचा किती कीस पाडणार ? काहीतरी नवीन लिहा की.

मी : अं ! नवीन काय लिहू ?

श : माझ्यावर लिहा की !

मी : अं ! तुमच्यावर ?  तुम्ही काय करता ?

श : माझा स्वतःचा व्यवसाय आहे. पण ते असं इथं नाही सांगता येणार. त्यापेक्शा आपण लोनावळ्याला उतरु आणि निवांत बसून बोलुया. तुमचा पाहूणचार करण्याची जबाबदारी माझी.

(मी थोडासा विचार करुन याला मान्यता दिली. लोणावळ्याला उतरुन एका हॉटेलात कोपर्‍यातली जागा पकडून बसलो.)

मी : हं ! आता बोला. काय म्हणत होता तुम्ही ?

श : तुम्हाला थोडंस वेगळं वाटेल पण मी एक सराईत चोर आहे.

मी : क्काय !

श : श्श……..!  ओरडू नका !

मी : नाही म्हणजे… मी काय लिहू तुमच्यावर ?

श : त्यात काय ? अहो मुलाखत घ्या की माझी. तुम्हा लोकांना नाहीतरी कुतुहल असतच नाही का आमच्याबद्द्ल ?

मी : हो. ते ही खरच म्हणा ! ठीक आहे. करु या सुरुवात. बर मला सांगा तुम्हाला मलाच मुलाखत का द्यावीशी वाटली ? नाही म्ह़णजे, अशा कामात आपल्याकडे एक से   मंडळी   आहेत म्हणून विचारतो.

श : केला होता तसा विचार पण मग नंतर तो विचार रद्द केला. विचार केला की राजू परुळेकरला मुलाखत द्यावी पण तो ती मोबाईल नंबर सकट छापतो आणि

वरुन छातीठोकपणे रात्री १२ वाजता ह्या नंबरावर फोन करुन खात्री करा म्हणतो.  तुमचा तो निखील वागळे तो तर मुलाखत घेतोय की देतोय तेच कळत नाही.

मी : तुम्हाला मुलाखत देताना भीती नाही वाटतय ?

श : त्यात कसली आलीय भीती ? अहो इथे अतिरेकी, नक्षलवादी, डॉन लोक मुलाखती देतात आणी तुम्ही त्या छापता, दाखवता.

मी : ओक्के ! ठीकय. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही या धंद्यात कधीपासून आहात ? तुमची धंध्याची पद्धत काय असते ?

श : तस पाहाल तर मी फार लहानपणीच या व्यवसायात आलो. माझे वडील देखील ह्याच धंद्यात होते. म्हणजे आमचा वडिलोपार्जित बिजनेसच म्हणा ना.

मी : मग या व्यवसायासाठी काय पात्रता लागते ?

श : एखादा चांगला गुप्तहेर बनण्यासाठी जी पात्रता लागते जवळजवळ तशीच. म्हणजे.. योग्य परीस्थीतीची तासनतास वाट पाहणे, चिकाटी, संयम इ. इ. माझे वडील नेहमी सांगायचे “बाळा ! बाई आणि घाई वाईट”

मी : तुम्ही साधारणपणे तुमचा कस्टमर कसा निवडता ?

श : मी साधारणपणे बाई आणि गरीब माणूस निवडत नाही. सहसा मध्यमवर्गीय आणि श्रीमंत माणसे निवडतो.

मी : का ? असं का ?

श : असं बघा !  गरीबाकडे चोरण्यासारखे जास्त काही नसते. थोड्याफार मार्जीनसाठी रिस्क घेण्यासाठी मी मारवाडी नव्हे. तसेच बायका मुळातच चलाख असतात. शिवाय कधी पकडलो गेलो की त्या बाईवर इंप्रेशन मारण्यासाठी पब्लीक जास्तच हात धुवून घेतं.

मी : मग मध्यमवर्गीय आणि श्रीमंत काय करतात ?

श : मध्यमवर्गीय शक्यतो तक्रार करत नाही कारण आपली तक्रार ऐकणारा या जगात कोणी नाही अशी त्याची खात्री असते. तसेच आमच्यापेक्षाही तोच पोलीस, कोर्ट कचेरीला घाबरत असतो. आपण फसवले गेलोय हे कुणाला कळाले तर आपले ह्से होईल असाही त्याचा विचार असतोच. तसेच श्रीमंत माणसाला देखील कोर्ट कचेरीचा तिटकारा असतो.

मी : हं ! पण तुम्हाला असं नाही वाटत की तुम्ही दुसर्‍याचे पैसे लुबाडत आहात ?

श : मुळीच नाही. असं बघा ! मुळात व्यवसाय म्हटला की त्यात भावभावनांना थारा नसतो. तुम्ही कमावलेला सगळाच पैसा तुमचा नसतो. डॉक्टर, वकील, वाह्तूक पोलीस तुम्हाला लुबाडतात तेव्हा तुम्हाला वाईट वाटतच ना ? पण म्हणून तुम्ही त्यांच्याविषयी तक्रार करता काय ? हे सगळे तर तुमच्या डोळ्यादेखत लुबाडतात. आम्ही तर तुम्हाला याची कल्पना ही येऊ देत नाही.

मी : तुम्हाला कधी तुमच्या कस्टमरची दया येत नाही काय ?

श : कसयं ! एकदा तुमचे बेसीक फंडे क्लीअर असले ना की मग तुम्हाला असे काही वाटत नाही. गाय अगर घास से दोस्ती करेगी तो खायेगी क्या ?

मी : तुम्ही एखादा कस्टमर निवडला की तुमची पुढची प्रोसीजर कशी असते ?

श : अस पाहा ! कस्टमर निवडीचे आणि त्यापुढ्ची प्रोसीजर ही प्रत्येक वेळी वेगवेगळी असते. तुम्ही म्हणता तस प्री प्लान्ड असं जास्त काही नसतं. आपलं कस्टमर निवडणे आणि ते डील लवकरात लवकर संपवणे हे फार महत्त्वाचे असते. ते आमचे सिक्रेट असल्याने तुमच्याशी शेअर करु शकत नाही. सॉरी ! पण शक्यतो मी अशा डीलवर जाताना नीटनेटके कपडे घालतो, सेंट लावत नाही. व्यसन करत नाही. कोणाशीही बोलत नाही. कुणाचा धक्का लागला तरी अरेरावी करत नाही. त्यामुळे तुम्ही लोकांच्या नजरेत येण्याची शक्यता असते. अंगावर कोणताही खरा पुरावा (लायसन्स, फोटो आयडी कार्ड ) ठेवत नाहि.

मी : तुम्ही हा  व्यवसाय एकटेच बघता की अजून कोणी पार्टनर वगैरे ? किंवा हाताखाली कोणी नोकर चाकर ?

श : नाही. तुम्हाला तर माहीतच आहे की आजकाल चांगली माणसं मिळणं किती कठीण झालय ते ! शिवाय पार्टनरशीपमधे सक्सेस रेट अगदीच कमी असतो. हे जवळ्पास सर्वच क्षेत्रांना लागू आहे.

मी : बरं ! पोलीसांना काही ह्प्ता वगैरे !

श : तोबा ! तोबा ! मुळीच नाही. माझे क्रिमिनल रेकॉर्ड अगदी साफ आहे.  शिवाय पोलीस म्हणजे विश्वासाची जात नाही. आपलेच पैसे खातील आणि उद्या आपल्यालाच इंगा दाखवतील.

(इतक्यात माझा मोबाईल वाजला आणि मला घरुन तातडीचे बोलावणे आले )

मी : सॉरी, मला मुलाखत आवरती घ्यावी लागेल पण परत कधी भेटलो तर पुढचा भाग नक्की लिहू या.

श : हरकत नाही. मात्र हा भाग नक्की तुमच्या ब्लॉगवर टाका. मी वाचेनच !

मी : ओक्के ! भेटूया मग !


Responses

  1. मस्त झालाय लेख! आवडला.

    • धन्यवाद ! आपल्यासारख्या जेष्ठ ब्लॉग लेखकाकडून प्रतिक्रिया मिळणे हे मी भाग्यच समजतो.

  2. खूप भारी जमलाय लेख!


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: