Posted by: rajdharma | 27/02/2012

मराठी परिभाषा कोश

मित्रांनो,
खालील संकेतस्थळास निश्चितच भेट द्या.या संकेतस्थळावर ३५ परिभाषांमधील २,६७,००० इंग्रजी शब्दांचा व त्यांच्या मराठी प्रतिशब्दांचा अफाट संग्रह आहे!
मला तर आवडला बुवा !

http://www.marathibhasha.com/

Posted by: rajdharma | 01/01/2011

नवीन वर्षाचा संकल्प

मित्रांनो,

नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

माझा संकल्प एका वाक्याचा !

” संकटाला भिडायचं, आजच…आत्ताच, लगेच !”

मागील वर्षापर्यंत मी एखादे संकट आले की सुरक्षीत भुमिकेत शिरण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत असे, किंवा मग त्याचा सामना किती उशीरा करता येईल ते पाहत असे. त्यामुळे संकट टळत नसेच मात्र त्याची व्याप्ती वाढत असे.

मग एकदा दोनदा वरील संकल्पाप्रमाणे प्रयत्न करुन पाहिले आणि काय आश्चर्य,  “प्रॉब्लेम का अंत…तुरंत !”

सो, द फॉर्म्युला नीड्स टू बी कंटीन्युड धीस ईयर !!!!!!!!

काय म्हणता ?  एकदा आजमावून बघा तर !

मित्रांनो,

कळविण्यास दु:ख वाटते की नियोजीत भयकथा दिवाळी विशेषांकासाठी पुरेसे साहित्य उपलब्ध न झाल्याने हा अंक प्रकाशीत होऊ शकत नाही.

अंकासाठी साहित्य पाठविलेल्या मित्रांचे आभार !!

पुढील वर्षी पुन्हा प्रयत्न करीन म्हणतो. पाहूया यश येते का ते !

 

धन्यवाद !

आवाज चे संपादक श्री. सुहास पाटकर यांचे २ ऑक्टोबर २०१० रोजी निधन झाले.

“आवाज” ने माझी प्रत्येक दिवाळी फटाके न फोडता ही धुमधडाक्यात साजरा करण्यात मोलाचा हातभार लावला आहे. “आवाज” ची खिडकी चित्रे संकल्पना तर इतकी यशस्वी झाली की नंतर केवळ तीच संकल्पना उचलून इतर किती तरी दिवाळी अंक निघू लागले.

श्री. भाऊ पाटकर (श्री. सुहास पाटकर यांचे वडील) यांच्या पश्चात श्री. सुहास पाटकर यांनी “आवाज” ची धुरा आठ वर्षे समर्थपणे सांभाळली होती.

यंदा आवाज चे हिरक महोत्सवी वर्ष आहे. अंकाची जवळपास सर्वच तयारी पूर्ण करुन सुहास यांनी या जगाचा निरोप घेतला. दिवाळीत सुहास पाटकरांचा अंक मला हसवेल आणि त्यांची आठवण उदास करेल हे नक्की ! तसेच मनातल्या मनात यावर्षीच्या तसेच पुढील वर्षीच्या अंकाची तुलना होईल हे ही नक्की !

श्री. सुहास पाटकरांच्या कुटुंबियांना त्यांचा विरह सहन करण्याची शक्ती मिळो हीच प्रार्थना !

मित्रहो,

दिवाळी २०१० निमित्त एक विशेषांक काढण्याचा विचार करत आहे.  विषय आहे “भयकथा” ह्या अंकात फक्त भयकथा/रहस्यकथा/गुढकथा यांनाच स्थान देण्यात येईल.

याद्वारे मी लेखकांना आवाहन करीत आहे की त्यांनी आपले पूर्वी कुठेही प्रकाशित न झालेले व स्वलिखित लिखाण संपादक मंडळास bhaykathadiwali@gmail.com या पत्त्यावर विरोपाने पाठवावे. सदर लिखाण १० ऑक्टोबर २०१० पर्यंत पाठवावे. त्यानंतर  आलेल्या लिखाणाचा गरज पडल्यास विचार केला जाईल.

१. लिखाण युनिकोड फॉन्ट वापरुन टेक्स्ट फाईल किंवा .doc फाइल या स्वरूपातच पाठवावे. प्रोप्रायटरी फॉन्ट वापरल्यास तो      फॉन्ट सोबत पाठवावा.

२. कथा पाठवितांना विषय : दिवाळी २०१० – भयकथा विशेषांक असे असावे.

३. कोणत्याही प्रकारचे लिखाण पाठवताना त्याची सॉफ्ट/हार्ड कॉपी स्वतःजवळ ठेवावी.

४. शक्यतो महाजालावर प्रकाशित रचना पाठवू नयेत. पाठविल्यास त्यासोबत त्या कोठे प्रकाशित झाल्या आहेत त्याचा संदर्भ द्यावा.

५. या दिवाळी अंकात प्रकाशित होणार्‍या कथा ह्या फक्त मनोरंजनाकरीता असून त्याचा उद्देश अंधश्रद्धेचा प्रसार करणे हा नाही.

६. कोणत्याही कथा प्रकाशित करणे / न करणे हा अधिकार संपादकांचा राहिल.

७. पाठवलेल्या लिखाणात संपादक मंडळ आवश्यकतेनुसार शुद्धलेखन तपासणी करण्याचा / ले आउट मधे बदल करण्याचा / आक्षेपार्ह
लिखाण गाळ्ण्याचा हक्क राखून ठेवत आहे.

८. आपण पाठविलेल्या लिखाणाची पोच विरोपाद्वारे देण्यात येईल. मात्र आपले लिखाण प्रकाशित करण्याची स्वीकृती देता येईलच असे
नाही.

९. दिवाळी अंकासाठी पुरेसे साहित्य न मिळाल्यास अंक प्रकाशित केला जाणार नाही. त्याची घोषणा याच ब्लॉगवर केली जाईल.

१०. आपण पाठविलेले लिखाण हे केवळ आपलेच आहे याची दक्षता घ्यावी. लिखाणाच्या ह्क्कावरुन भविष्यात उदभवणार्‍या वादाला /
कारवाईला लेखकालाच सामोरे जावे लागेल. संपादक कोणत्याही प्रकारे याला जबाबदार राहणार नाहीत.

११. आपल्या कथेबरोबर आपले संपूर्ण नाव, पत्ता, भ्रमणध्वनी क्र. कळवावा.

१२. व्यंगचित्रकारांनीदेखील विशेषांकाच्या विषयाला पुरक व्यंगचित्रे पाठवावीत.

१३. प्रकाशित कथांना / चित्रांना कोणत्याही प्रकारचे मानधन दिले जाणार नाही.
हा पहिलाच प्रयत्न असल्याने काही चुका होतील त्या पदरात घेऊन वाचक / लेखक सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे.

चीनचा भारतद्वेष प्रत्येक बाबतीत दिसून येतो. मी नुकतेच चीनमध्ये निर्मित TPLink चा वायरलेस राऊटर घेतला. सर्व सेटिंग्स केल्यानंतर राऊटर वर भारतीय प्रमाण वेळ टाकावी म्हणून “टाईम सेटिंग” चा टॅब बघीतला आणि धक्काच बसला. देशांच्या प्रमाणवेळेच्या यादीत कोठेही भारताचे नाव नाही. इंटरनेटवरुन तुमच्या देशाची प्रमाणवेळ बघण्यासाठी एक टॅब आहे तेथे जाऊन टिचकी मारल्यानंतरही तेथे इस्लामाबाद, कराची अशी प्रमाणवेळ दिसते. मी यासंदर्भात डीलरकडे विचारणा केली असता त्याने फर्मवेअर अपग्रेड केल्यावर हवा तो बदल होईल असे सुचविले. त्याप्रमाणे बदल करुन बघीतला मात्र काहीही फरक पडला नाही. त्यानंतर मी त्यांच्या टेक्नीकल सपोर्ट टीम ला मेल टाकून असे का ? विचारले मात्र काहीही उत्तर आले नाही.

खरोखरच हा भारतद्वेष असावा की तांत्रिक चूक ? मला तर ही तांत्रिक चूक असणे केवळ अशक्य वाटते. खाजगी कंपनी जर असे वागू शकते तर सरकारी पातळीवर काय होत असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी !

तुम्हाला काय वाटते ?

Posted by: rajdharma | 01/09/2010

पुन्हा एकदा मुलाखत

मागील लेखासारखी ही काल्पनिक मुलाखत नाहीये. मी संगणक क्षेत्रात काम करतो (हार्डवेअर आणि नेटवर्कींग). या क्षेत्रात नोकरी वारंवार बदलण्याचे प्रमाण खुपच आहे. त्यामुळे मुलाखती घेण्याची वेळ वारंवार येते. त्यातील हे काही नमुने…..

मुलाखती वेगवेगळ्या पदांसाठी होत्या. (हार्डवेअर इंजीनीअर, बॅक ऑफीस असिस्टंट, रिसेप्शनिस्ट, अकाउंटंट इ.) पण सगळ्यांची प्राथमिक मुलाखत मलाच घ्यायची होती.

मुलाखत क्र. १ : (पद : बॅक ऑफीस असिस्टंट)

(हा उमेदवार केरळचा आहे. उमेदवाराचा रेझ्युमे अतीशय पॉवरफुल आहे. ७ वर्षात ३५ नोकर्‍या. ह्याची मुलाखत घेऊ की नको हा मनात आलेला पहिला विचार)

मी : टेल मी अबाऊट युवरसेल्फ !

उमेदवार : सार माय नेम इज ………………… आएम फ्राम गेरला. (केरला). आई एम हेविंग सेवन इयर्स रीच एक्सपिरीयन्स.

मी : ऑफकोर्स ! आय कॅन सी दॅट इन युवर रेझ्युमे !

उमेदवार : थँक्यू सार !

मी : व्हीच वॉज युवर फस्ट जॉब ?

उमेदवार : आय डोन्ट रिमेंबर सर. आय हॅव चेंज्ड सो मेनी जॉब्स !

मी : ओक्के. आय विल रीड इट फॉर यु. यु वेअ‍र वर्कींग एज अ टीचर फॉर प्रायमरी फॉर सिक्स मन्थस. व्हाय यु लेफ्ट धिस जॉब ?

उमेदवार : या.. आय रिमेम्बर सार ! एक्चुली आय वॉज नॉट अर्निंग इनफ मनी फ्रॉम ईट एन्ड चिल्ड्र्न युज्ड टु ट्रबल मी मच. यु नो दीज कीडस आर वेरी वेरी नॉटी.

मी : या ! आय गॉट इट. ओके, विल मुव्ह टू युवर नेक्स्ट जॉब. यु डोन्ट ट्राय टु रिमेम्बर, आय वील रीड इट फॉर यु. (काय करु, मला वेळ वाचवायचा होता ना !) युवर नेक्स्ट जॉब वॉज एज अ क्लर्क ईन ……. कंपनी फॉर थ्री मन्थस. व्हॉट इज द रीझन टु स्टे हियर ओन्ली फॉर थ्री मन्थस ?

उमेदवार : सार ! माय बॉस वॉज नॉट अ गुड गाय. ही वॉज हरॅसींग मी. आय कॅन नॉट टॉलरेट दॅट !

एकंदरीत या उमेदवाराच रेझ्युमे बघतांना असे लक्षात आले की हा माणुस ६ ते ७ महिन्यापेक्षा जास्त एकाही ठिकाणी टिकलेला नाही. अजुन चार पाच प्रश्न विचारल्यानंतर मला एक कळाले की हा फार दु:खी माणूस आहे आणि प्रत्येकजण याला हरॅस करण्याच्याच मागे आहे. पण मग विचार केला की ह्या हरॅस करणार्‍यांच्या लिस्टमधे माझ्यासारख्या माणसाची भर कशाला ? म्हणून मग मी त्याला मनोमन डिच्चू देऊन टाकायचे ठरवले आणि मुलाखत संपविली.

———————————————————————————————————————————

मुलाखत क्र. २ : (पद : अकाउंटंट)

(ह्या महिला उमेदवार आहेत. मराठी आहेत हे माहीत असुनही इंग्रजी संभाषण कला तपासण्यासाठी मी इंग्रजी मधून सुरु होतो)

मी : टेल मी अबाऊट युवरसेल्फ !

उमेदवार : इंग्रजी येत नाही. मराठीतून बोला.

(पहिल्याच बॉलवर मी आउट.)

मी : बरं ! बरं ! तुमच्याबद्दल माहिती सांगा.

उमेदवार : लग्न झालयं. मागच्याच वर्षी डिलीवरी झाली.

(क्षणभर मी डॉक्टर आहे आणि ह्या बाई माझ्याकडे आलेल्या पेशंट आहेत की काय असे वाटून गेले.)

मी : तस नाही. मला तुमच्या नोकरीच्या अनुभवाबद्दल सांगा.

उमेदवार :  एक वर्षाचा एक्सपिरेन्स आहे. टॅलीमधे काम करु शकते.

मी : हं ! मला एक सांगा, जर तुमच्या कस्टमरकडून चेक आला की तो तुम्ही कोणत्या खात्यात लिहिता ? क्रेडीट की डेबीट ?

उमेदवार : (बराच वेळ विचार करुन) मी अगोदर कामाला होते ते सर मला सांगायचे आणि मी फक्त इंट्र्या करायचे.

हे अगाध ज्ञान ऐकल्यावर मी जास्त खोल पाण्यात न उतरता काठावरुनच अंदाज बांधला आणि तांत्रीक प्रश्न आवरते घेतले.

मी : किती पगाराची अपेक्षा आहे ?

उमेदवार : पहिल्या ठिकाणी साडेपाच हजार मिळत होता. आता नऊ हजार तरी मिळाला पाहीजे.

मी : का ? इतक्या पगाराची का बरे अपेक्षा ?

उमेदवार : महागाई पाहिली किती वाढलीय ते ? शिवाय फॅमिली वाढली. पगार नको का वाढायला ?

(अहो अगोदर नोकरी तर मिळवा मग पगार वाढवून घ्या.)

मी : ठीक आहे. कळवू तुम्हाला. तुमचा इ-मेल एड्रेस आहे ना ?

उमेदवार : नाही इ-मेल एड्रेस नाहीये. लोक नको नको ते इ-मेल पाठवतात म्हणून नाही बनविला.

मी : अहो मग आम्ही तुम्हाला कळविणार कसे ?

उमेदवार : माझ्या बहिणीचा इ-मेल एड्रेस देते त्यावर कळवा.

(वा रे वा ! म्हणजे बहिणीला नको नको ते इ-मेल आले तर चालतात वाटतं !)

मी : ठीक आहे. या तुम्ही !

———————————————————————————————————————————

मुलाखत क्र. ३ : (पद : हार्डवेअर इंजीनीअर )

(हा उमेदवार लालूप्रदेश….चुकलो …. उत्तर प्रदेशचा आहे. ) हे उमेदवार फार्फार नम्र असतात. (म्हणजे तसे ते भासवतात तरी.)

मी : टेल मी अबाऊट युवरसेल्फ !

उमेदवार :  सर ! आई एम ……..कुमार. आई हॅव डन माई ग्रेजुएशन इन बी.ए. फ्राम पुर्वांचल युनिवरसिटी.

(जसे गुज्जु बाय डिफॉल्ट भाई किंवा बेन असतात तसे हे कुमार युपी बिहार मधे लाखोंच्या संख्येने असावेत असे माझे अनुमान बनले आहे.  ह्यांचे आई  (I) आणि माई (My)वर फारच प्रेम असते.)

मी : व्हाट वॉज युवर लास्ट प्रोफाईल ?

उमेदवार : सर क्षमा चाहुंगा लेकीन क्या मै हिंदी मे बात कर सकता हूं ?

मी : क्यों ? अंग्रेजी नही आती ?

उमेदवार : नही ! आती है सर लेकीन इतनी क्लीअर नही है !

मी : तो फिर कस्टमर से बात कैसे करोगे ? मराठी आती है क्या ?

उमेदवार : थोडी थोडी समज मे आती है सर ! वैसे यहा मराठी लोग हिंदी अच्छी बोल लेते है तो काम चल जाता है !

मी : पिछला जॉब क्यूं छोडा ?

उमेदवार : सरजी गाँव जाना पडा मई मे तो फिर कंपनी से निकाल दिया गया !

मी : ठीक है ! सॅलरी कितनी लोगे ?

उमेदवार : सरजी आप ही सोच समझके दे दिजीये बस !

मी : ठीक है ! कबसे जॉईन करोगे ?

उमेदवार : कलसे आ जायेंगे सरजी !

———————————————————————————————————————————

मुलाखत क्र. ४ : (पद : हार्डवेअर इंजीनीअर )

मी : टेल मी अबाऊट युवरसेल्फ.

(हा उमेदवार मराठी आहे.)

उमेदवार : माय नेम इज राहूल …………………… आय एम २० इयर ओल्ड. सो….सो….सो…..

(इंग्रजी बर्‍यापैकी आहे हे पाहून मी गाडी मराठीच्या रूळावर नेतो)

मी : अगोदरचा जॉब का सोडला ?

उमेदवार : गणपतीला जायला सुट्टी मिळाली नाही मग सुट्टी न घेताच गेलो.

मी : आम्ही देखील गणपतीला सुट्टी देत नाही.

उमेदवार : चालेल सर .

( आता हा चालेल म्हणतो पण मला माहित असते कि हा परत गणपतीला सुट्टी मागणार)

(रेझ्युमेमधे तांत्रिक माहिती ठासून भरलीय. अशी ठासून भरलेली माहीती पाहीली की दारुगोळ्याचं कोठार सापडल्याचा आनंद होतो व दोन चार प्रश्नांनंतर हा दारुगोळा खरोखरच कामाचा आहे की फुसका आहे ते कळून येते. या उमेदवाराला २-४ प्रश्न विचारल्यावर हा फुसका बार आहे हे लगेचच कळाले.)

मी : पगाराची काय अपेक्षा आहे ?

उमेदवार : १५ ह्जार तरी पाहीजेत.

मी : पण नॉलेजच्या हिशोबानेच पगार देऊ शकतो. मी तुला तु दिलेल्या माहितीतुनच १५ प्रश्न विचारतो. त्यातील जितके प्रश्न बरोबर येतील त्या प्रत्येक प्रश्नाबरोबर तुझा पगार रु. १०००/- प्रमाणे वाढवुयात. चालेल ?

उमेदवार : (चेहरा पाहण्यालायक) चालेल !

मी : तुम्ही एचपी ब्रँड्च्या मशीनवर काम केलय असे लिहीलेय ? मग तुम्ही एखादी कंप्लेंट लॉग करताना कोणता नंबर फिरविता ?

उमेदवार : ?????????????????? (हा नंबर प्रत्येक एचपी मशीनवर काम करणार्‍या इंजीनीअरच्या अगदी तोंडपाठ असतोच असतो. तो क्र. आहे ३०३०३६३६३

मी : उत्तर नाही ? ठीक आहे. आता तुमचा पगार रु. १४,०००/-. बर दुसरा प्रश्न. लुप बॅक आय पी एड्रेस सांगा ?

उमेदवार : १९२.१६८.१.१

मी : चुक ! उत्तर आहे १२७.०.०.० आता तुमचा पगार रु. १३,०००/-. आता तीसरा प्रश्न : ४० जीबीचे फॅट ३२ पार्टीशन बनवता येईल काय ?

उमेदवार : हो. येईल.

मी : चुक. फॅट ३२ मधे फक्त ३२ जीबीपर्यंतच पार्टीशन बनवता येते. आता तुमचा पगार आहे रु. १२,०००/-

(असे अजून ५-६ प्रश्न विचारल्यावर मात्र त्याचा धीर सुटला)

उमेदवार : सर तुम्ही सांगाल तो पगार मी घेईन पण मला कामावर ठेवा.

———————————————————————————————————————————

वरील नमुने अगदी भन्नाट नसले तरी यापेक्षाही एकेक नग येतात व करमणूक करुन जातात. अर्थातच गमतीचा भाग सोडल्यास आम्ही आमच्या बजेटप्रमाणे व त्यातल्या त्यात बरे उमेदवार निवडतो.

मुलाखत देताना व घेतांना काही बाबी लक्षात आल्या त्या अशा.

१. तुमची वेळ चांगली असली पाहिजे. म्हणजेच कंपनीला जर तातडीची गरज असेल तर मुलाखत अगदी यशस्वी झाली नाहीतरी नोकरी
मिळण्याची शक्यता जास्त असते.

२. मुलाखत घेणार्‍याकडे फावला वेळ बराच असला तर तुमचे काही खरे नाही. तो अगदी एक एक मुद्दा चावून चोथा करुन खाणार हे
नक्की.

३. काहींना आपले इमेल एड्रेस don@yahoo.com किंवा superstar@gmail.com असे बनवितात. असे इमेल एड्रेस बघणार्‍याच्या
डोक्यात नक्की जातात.

४. रेझ्युमे लिहिताना शक्यतो आपण जे काम केले आहे त्या त्या टेक्नोलॉजीवरच भर असू द्यावा. उगाच कोणाचा तरी ढापून लिहून नका.
आयत्या वेळी उत्तर देण्यास अडचण होते.

५. मुलाखत देताना अतिशय नम्रता किंवा अतिशय उद्धटपणा दिसणार नाही याची काळजी घ्या.

———————————————————————————————————————————

कितीही नाही म्ह्टले तरी नोकरी देणार्‍यालाही बर्‍याच मर्यादा येतात.

कोकणी माणूस म्हटला की त्याला होळीला आणि गणपतीला सुट्टी पाहिजेच. मग आणा बदली माणूस.

घाटावरचा माणूस म्ह्टला की त्याला यात्रेला सुट्टी हवीच. मग आणा बदली माणूस.

युपी/बिहारवाला माणूस म्ह्टला की त्याला मे/जून मधे किमान १५ दिवस ते कमाल १ महिना सुट्टी लागते. मग आणा बदली माणूस.

लेडीज स्टाफ म्हटला की त्यांना संध्याकाळी / रात्री थांबवून घेता येत नाही.

याशिवाय नेमके सोमवारी आजारी पडणारे देखील कमी नाहीत. (सुट्टीचा वार रविवार बदलून सोमवार करावा की काय इतपत मला त्रास॑ होतो कधी कधी.)

काही कलाकार इतके जास्त आजारी पडतात की त्यांना फोन / एसएमएस करुन कळवायचे देखील त्राण राहत नाही.

काही जण रात्री २-३ वाजता एसएमएस करुन आल्याचे सांगून आपण किती पंक्चुअल आहोत हे दाखवून देतात.

असो. आता इतकेच.

( ह्या लेखात कोणत्याही जाती/धर्माच्या /प्रांताच्या / लिंगाच्या व्यक्तीचा किंवा त्याच्या शिक्षणाचा अनादर करण्याचा हेतू नाही. जे मांडले आहे ती केवळ वस्तूस्थिती आहे आणि वेळोवेळी त्यांचा प्रॉब्लेम समजून घेऊन मदत करण्याकडेच कल असतो.)

समाप्त…………………..

(अवांतर : हार्डवेअर इंजीनीअर असे गोंडस नाव असले तरी प्रत्यक्षात ही मुले १० वी /१२वी / पदवी घेऊन एखाद्या वर्षाचा कोर्स करुन करीयर करतात.)Posted by: rajdharma | 26/08/2010

एक मुलाखत

मी कामानिमित्त भारत भ्रमण करत असतो. प्रवासात वेगवेगळ्या प्रकारची माणसे भेटतात. त्यांच्याशी विविध विषयावर गप्पा मारताना करमणूकही होते आणि ज्ञान वाढते. अशीच एका वल्लीशी माझी गाठ पडली त्याचाच हा किस्सा ! सोयीसाठी आपण त्या व्यक्तीला “श” म्हणूया.

श : नमस्कार !

मी : नमस्कार !

काय ? कुठे चाललाय ?

मी : पुण्याला गेलो होतो  ऑफीसच्या कामाकरीता. आता घरी चाललो आहे. आपण ?

श : मी ही मुंबईलाच चाललोय. माझा स्वतःचा व्यवसाय आहे. त्यानिमित्त बराच प्रवास करावा लागतो.

(मी संवाद थांबवून पुस्तकात डोके घालतो.)

श : पुस्तक वाचनाची फारच आवड  दिसतेय वाटतं !

मी : होय. सध्या “हिंदू” वाचतोय.

श : छान ! छान ! सध्या मराठी सायटींवर चांगलीच चर्चा रंगलेली आहे ह्या पुस्तकावर.

मी : होय. पण बरेच जण त्यावर न वाचताच लिहितायत. बोलतायत. मी पण त्यावर लिहावं म्हणतोय, म्हणून वाचून घेतो.

श : अरे व्वा ! म्हणजे तुम्ही ब्लॉग रायटर का ? अहो पण एकाच विषयाचा किती कीस पाडणार ? काहीतरी नवीन लिहा की.

मी : अं ! नवीन काय लिहू ?

श : माझ्यावर लिहा की !

मी : अं ! तुमच्यावर ?  तुम्ही काय करता ?

श : माझा स्वतःचा व्यवसाय आहे. पण ते असं इथं नाही सांगता येणार. त्यापेक्शा आपण लोनावळ्याला उतरु आणि निवांत बसून बोलुया. तुमचा पाहूणचार करण्याची जबाबदारी माझी.

(मी थोडासा विचार करुन याला मान्यता दिली. लोणावळ्याला उतरुन एका हॉटेलात कोपर्‍यातली जागा पकडून बसलो.)

मी : हं ! आता बोला. काय म्हणत होता तुम्ही ?

श : तुम्हाला थोडंस वेगळं वाटेल पण मी एक सराईत चोर आहे.

मी : क्काय !

श : श्श……..!  ओरडू नका !

मी : नाही म्हणजे… मी काय लिहू तुमच्यावर ?

श : त्यात काय ? अहो मुलाखत घ्या की माझी. तुम्हा लोकांना नाहीतरी कुतुहल असतच नाही का आमच्याबद्द्ल ?

मी : हो. ते ही खरच म्हणा ! ठीक आहे. करु या सुरुवात. बर मला सांगा तुम्हाला मलाच मुलाखत का द्यावीशी वाटली ? नाही म्ह़णजे, अशा कामात आपल्याकडे एक से   मंडळी   आहेत म्हणून विचारतो.

श : केला होता तसा विचार पण मग नंतर तो विचार रद्द केला. विचार केला की राजू परुळेकरला मुलाखत द्यावी पण तो ती मोबाईल नंबर सकट छापतो आणि

वरुन छातीठोकपणे रात्री १२ वाजता ह्या नंबरावर फोन करुन खात्री करा म्हणतो.  तुमचा तो निखील वागळे तो तर मुलाखत घेतोय की देतोय तेच कळत नाही.

मी : तुम्हाला मुलाखत देताना भीती नाही वाटतय ?

श : त्यात कसली आलीय भीती ? अहो इथे अतिरेकी, नक्षलवादी, डॉन लोक मुलाखती देतात आणी तुम्ही त्या छापता, दाखवता.

मी : ओक्के ! ठीकय. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही या धंद्यात कधीपासून आहात ? तुमची धंध्याची पद्धत काय असते ?

श : तस पाहाल तर मी फार लहानपणीच या व्यवसायात आलो. माझे वडील देखील ह्याच धंद्यात होते. म्हणजे आमचा वडिलोपार्जित बिजनेसच म्हणा ना.

मी : मग या व्यवसायासाठी काय पात्रता लागते ?

श : एखादा चांगला गुप्तहेर बनण्यासाठी जी पात्रता लागते जवळजवळ तशीच. म्हणजे.. योग्य परीस्थीतीची तासनतास वाट पाहणे, चिकाटी, संयम इ. इ. माझे वडील नेहमी सांगायचे “बाळा ! बाई आणि घाई वाईट”

मी : तुम्ही साधारणपणे तुमचा कस्टमर कसा निवडता ?

श : मी साधारणपणे बाई आणि गरीब माणूस निवडत नाही. सहसा मध्यमवर्गीय आणि श्रीमंत माणसे निवडतो.

मी : का ? असं का ?

श : असं बघा !  गरीबाकडे चोरण्यासारखे जास्त काही नसते. थोड्याफार मार्जीनसाठी रिस्क घेण्यासाठी मी मारवाडी नव्हे. तसेच बायका मुळातच चलाख असतात. शिवाय कधी पकडलो गेलो की त्या बाईवर इंप्रेशन मारण्यासाठी पब्लीक जास्तच हात धुवून घेतं.

मी : मग मध्यमवर्गीय आणि श्रीमंत काय करतात ?

श : मध्यमवर्गीय शक्यतो तक्रार करत नाही कारण आपली तक्रार ऐकणारा या जगात कोणी नाही अशी त्याची खात्री असते. तसेच आमच्यापेक्षाही तोच पोलीस, कोर्ट कचेरीला घाबरत असतो. आपण फसवले गेलोय हे कुणाला कळाले तर आपले ह्से होईल असाही त्याचा विचार असतोच. तसेच श्रीमंत माणसाला देखील कोर्ट कचेरीचा तिटकारा असतो.

मी : हं ! पण तुम्हाला असं नाही वाटत की तुम्ही दुसर्‍याचे पैसे लुबाडत आहात ?

श : मुळीच नाही. असं बघा ! मुळात व्यवसाय म्हटला की त्यात भावभावनांना थारा नसतो. तुम्ही कमावलेला सगळाच पैसा तुमचा नसतो. डॉक्टर, वकील, वाह्तूक पोलीस तुम्हाला लुबाडतात तेव्हा तुम्हाला वाईट वाटतच ना ? पण म्हणून तुम्ही त्यांच्याविषयी तक्रार करता काय ? हे सगळे तर तुमच्या डोळ्यादेखत लुबाडतात. आम्ही तर तुम्हाला याची कल्पना ही येऊ देत नाही.

मी : तुम्हाला कधी तुमच्या कस्टमरची दया येत नाही काय ?

श : कसयं ! एकदा तुमचे बेसीक फंडे क्लीअर असले ना की मग तुम्हाला असे काही वाटत नाही. गाय अगर घास से दोस्ती करेगी तो खायेगी क्या ?

मी : तुम्ही एखादा कस्टमर निवडला की तुमची पुढची प्रोसीजर कशी असते ?

श : अस पाहा ! कस्टमर निवडीचे आणि त्यापुढ्ची प्रोसीजर ही प्रत्येक वेळी वेगवेगळी असते. तुम्ही म्हणता तस प्री प्लान्ड असं जास्त काही नसतं. आपलं कस्टमर निवडणे आणि ते डील लवकरात लवकर संपवणे हे फार महत्त्वाचे असते. ते आमचे सिक्रेट असल्याने तुमच्याशी शेअर करु शकत नाही. सॉरी ! पण शक्यतो मी अशा डीलवर जाताना नीटनेटके कपडे घालतो, सेंट लावत नाही. व्यसन करत नाही. कोणाशीही बोलत नाही. कुणाचा धक्का लागला तरी अरेरावी करत नाही. त्यामुळे तुम्ही लोकांच्या नजरेत येण्याची शक्यता असते. अंगावर कोणताही खरा पुरावा (लायसन्स, फोटो आयडी कार्ड ) ठेवत नाहि.

मी : तुम्ही हा  व्यवसाय एकटेच बघता की अजून कोणी पार्टनर वगैरे ? किंवा हाताखाली कोणी नोकर चाकर ?

श : नाही. तुम्हाला तर माहीतच आहे की आजकाल चांगली माणसं मिळणं किती कठीण झालय ते ! शिवाय पार्टनरशीपमधे सक्सेस रेट अगदीच कमी असतो. हे जवळ्पास सर्वच क्षेत्रांना लागू आहे.

मी : बरं ! पोलीसांना काही ह्प्ता वगैरे !

श : तोबा ! तोबा ! मुळीच नाही. माझे क्रिमिनल रेकॉर्ड अगदी साफ आहे.  शिवाय पोलीस म्हणजे विश्वासाची जात नाही. आपलेच पैसे खातील आणि उद्या आपल्यालाच इंगा दाखवतील.

(इतक्यात माझा मोबाईल वाजला आणि मला घरुन तातडीचे बोलावणे आले )

मी : सॉरी, मला मुलाखत आवरती घ्यावी लागेल पण परत कधी भेटलो तर पुढचा भाग नक्की लिहू या.

श : हरकत नाही. मात्र हा भाग नक्की तुमच्या ब्लॉगवर टाका. मी वाचेनच !

मी : ओक्के ! भेटूया मग !

सोमवार आला की मला माझे लहानपणचे दिवस आठवतात. शाळेत जायचा वैताग आला की मला चक्कर यायची, पोट दुखायचे, आणि बरेच काय काय होत असे.
आज देखिल सोमवारचा दिवस उजाडला की मला लहान मुलासारखे काहीतरी कारण सांगुन घरी बसावेसे वाटते. सोमवारी कामावर जायचे अगदी नकोसे वाटते. मात्र एकदा कामावर गेल्यावर सगळा आळस पळून जातो हे ही तितके खरेच.

आज प्रत्येकजण शिक्षणाचे महत्त्व सांगू लागला आहे. मराठी माध्यमातून शिकणे म्हणजे मागासलेपणाचे लक्षण वाटू लागले आहे. इंग्लिश माध्यम देखिल कमी म्हनून की काय आता इंटरनॅशनल अभ्यासक्रम शिकणे कसे आवश्यक आहे ह्यावर चर्चा झडत आहेत.

पण खरे सांगू दोस्तांनो ! ह्या स्पर्धेत बालकांचे बालपण हरवले आहे. चकाचक फॅशनच्या दुनियेत मनाचा निरागासपणा हरवत चालला आहे. भविष्याची तरतूद करताना वर्तमानकाळ नाहीसा होत चालला आहे.

खरे सांगू मित्रांनो ! मला आता ह्या क्षणी शाळेतले मुल व्हावेसे वाटत आहे. माझ्या लहानपणी मूल कमीतकमी ५ वर्षांचे होत नाही तोपर्यंत शाळेत जात नसे.
आता तर मूल एक वर्षाचे झाले रे झाले की त्याच्यामागे प्लेग्रुप, नर्सरी मोन्टेसरी इत्यादि इत्यादि झंझट चालु होते. आमची पीढी खुपच नशीबवान आहे की ज्याना आपले बालपण व्यवस्थित उपभोगता आले. “बालपणीचा काळ सुखाचा” हेच खरे !

Posted by: rajdharma | 04/08/2010

गोवा

कालच कामानिमित्त गोव्याला भेट देण्याचा प्रसंग आला. ज्यांना ज्यांना मी गोव्याला चाललोय असे सांगीतले तेव्हा बहुतांशी लोकांची एकच प्रतिक्रिया होती.

ती म्हणजे “वॉव ! मज्जाय”. कोणी काजू आणायला सांगीतले तर कोणी वाईन.

मी पण मनातूनच आनंदी झालो होतो. बर्‍याच वर्षांपूर्वी मैत्रीणीच्या लग्नाला मडगावला जायचा योग आला होता त्यानंतर पुन्हा गोव्याचे दर्शन झालेच नव्हते. पण ह्या आनंदावर लवकरच विरजणच पडायला सुरुवात झाली. एकतर कोकणाला मान्सूनने दिलेल्या तडाख्यामुळे गेले ११ दिवस कोकण रेल्वेची वाहतूक बंद पडलेली. शेवटी बसने जायचे ठरविले. त्यातही हाताशी वेळ कमी असल्यामुळे एस.टी. ची चौकशी करता आली नाही. शेवटी “नीता” च्या एसी बसचा पर्याय निवडला.
बसने जास्त लांबचा प्रवास करायचा म्हणजे पहिला प्रश्न येतो तो म्हणजे दोन नंबरचा. पोट व्यवस्थीत राहील ना ? जेथे गाडी थांबेल तेथे सुविधा व्यवस्थीत असेल ना ? बाजूचा सहप्रवासी कसा असेल ? गाडी व्यवस्थीत असेल ना ? ड्रायव्हर नीट असेल ना ? एक ना दोन…..
रात्री ९.३० ची बस भारतीय प्रमाणवेळेनुसार १०.३० वाजता आली. सुदैवाने बस नीटनेटकी होती. सहप्रवासी काकांना सर्दी असावी बहुतेक. त्यांनी तोंडाला रुमाल बांधून स्वतःची आणी सहप्रवाशांची काळजी घेतली होती हे पाहून बरे वाटले. बस रात्री एकदा आणी सकाळी एकदा अशी दोनदा २० मिनिटांसाठी थांबली आणी काहींनी पोटं भरुन घेतेले तर काहींनी खाली करुन घेतली.

ह्या वेळच्या प्रवासात नजरेत भरलेल्या दोन गोष्टी म्हणजे जागोजाग झालेली हॉटेल्स आणी शैक्षणिक संकुले. दुकानातील इतर वस्तूंबरोबर सिगारेट, गुटखा विकणार्‍या मुली पाहून मनाला दु:खच झाले. आता त्यांच्या द्रुष्टीने साबण काय आणी सिगारेट काय केवळ विकण्याची वस्तूच. पण त्यांनी त्या विकू नयेत असे मनाला वाटले हे निश्चित!

बराचसा प्रवास अंधारात झाल्यामुळे कोकण नीट निरखता आला नाही. मात्र कुडाळपासून पुढचा भाग सकाळच्या प्रवासात अनुभवता आला. हिरवाईची विविध रुपे बघून मन आनंदून गेले. पावसाने मुंबईपासून निघतांना जी साथ दिली ती शेवटपर्यंत. मात्र काहीही म्हणा ! एस.टी. च्या प्रवासात खिडकीतून येणारे पावसाचे तुषार, थंड हवा, लाल मातीचा वास यापैकी काही काही एसी बसच्या प्रवासात अनुभवता येत नाही. आपण आणी बाहेरचे जग यात एक न ओलांडता येणारी सीमारेषाच असते जणू !

गोवा आता बराच बदललाय असं वाटलं ! त्याच प्रमुख कारण म्हणजे मराठी, कोंकणी भाषा फारच कमी कामावर पडली. हिंदीचा प्रचार वाढलाय. गोव्याचा माणूस बहुधा भारताबाहेर गेलाय किंवा मुंबईला आलाय असं वाटतयं.

पावसाळा असल्याने हॉटेलचे बुकींग पटकन आणी स्वस्तात मिळाले. अंघोळ, पुजाअर्चा आवरुन वेरणे औद्योगीक वसाहतीमधील काम करायला निघालो. रिक्षावाल्याशी घासघीस करुन रु. २५० चे रु. २२०/- केले. कंपनीत गेल्यावर रिक्षावाल्याला एक तासात येतो सांगून आत गेलो. मात्र काम संपवायला तीन तास लागले. बाहेर येऊन पाहतो तर हे महाशय अजुनही वाट पाहतायत. मग वेटींग चार्ज व परतीचे भाडे मिळून रु. ३५०/- रु. दिले. चार तासात ६००/- रु. ची कमाई म्हणजे बरीच म्हणायची.

काम वेळेवर संपवून दुसर्या दिवशी पुन्हा कामावर जायची घाई, घरी नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या भेटीची ओढ यामुळे लवकर घरचा रस्ता धरला.
काजू खरेदी करुन परतीचा रस्ता धरला मात्र गोवा अनुभवायचा राहूनच गेला. बघुया पुन्हा कधी जमतय का ते !

Older Posts »

प्रवर्ग